वीरगळ
वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.
इतिहास
संपादनवीरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असे मानले जाते. कर्नाटक राज्यात मोठे-मोठे वीरगळ आढळून येतात. त्यातील काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेख कोरलेले वीरगळ तुलनेने कमी आहेत. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड. वीरकल्लू म्हणजे वीरांचा दगड. त्यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा. [१]
वीरगळाचे स्वरूप
संपादनसाधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात. वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते. उदा. गाईसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई, इ. मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते. सर्वांत वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे, असे दाखवलेले असते. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते असे यातवून सुचवायचे असावे. काही वीरगळ हे चंद्र सूर्य यांनी अंकित असतात. आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहील असे यातून सूचित करायचे असे मानतात. काही वीरगळ हे सतीच्या हाताने अंकित असतात. एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी त्याच्यासह सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते. [१] या स्मारक शिळांवर कोणाचेही नाव नसते. फक्त चित्रे कोरलेली असतात. त्यावरून त्या वीराचे वीरकृत्य समजून येते. काही वीरगळांवर शिलालेखही असतात.[२]
विविध प्रकार
संपादनवीरगळांचे प्रमुख प्रकार दोन आहेत -
१) आयताकृती वीरगळ - फक्त समोरून किंवा ३ बाजूने कोरलेली
२) स्तंभ वीरगळ - चारही बाजूने कोरलेली
उपप्रकार
संपादनज्यामुळे वीरगती मिळाली त्यानुसार वर्गीकरण :
१. वीरबळी वीरगळ-
ही वीरगळ म्हणजे जे वीर राजा युद्धात जिंकावा म्हणून स्वतःचा स्वतःच्या हाताने शिरच्छेद करून घेत त्यांची शिळा होय.
२. गोवर्धन/गोधन वीरगळ-
यादव काळात गोधन हेच श्रेष्ठ धन होते मग त्याची प्राणी वा दुसऱ्या गावाकडून गोवर्धन/गोधन वीरगळ
३. पशू वीरगळ-
गावावर झालेला वाघ, रानगवे, इ. पशूंचा हल्ला परतवताना आलेले वीरमरण
४. द्वंद्व वीरगळ-
दोन गावातील तुल्यबळ वीरांचे युद्ध/ कुस्ती यात आलेले वीरमरण
५. डोली वीरगळ-
लग्न विधीत झालेले हल्ले, विघ्न दूर करताना आलेले वीरमरण.
६. गाववली परचक्र युद्ध-
एक वीर अनेकांशी लढताना आलेले वीरमरण
७. अश्वदल/गजदल वीरगळ-
८. मोठ्या युद्धात आलेले वीरमरण
९. चौर्य वीरगळ-
चोरांचे हल्ले परतवताना आलेले वीरमरण. यात चोरांकडे तलवारी तर ते लढणारे सामान्य असल्याने त्यांच्याकडे काठी असे चित्र कोरलेले असते.
९. साधू/संत वीरगळ-
राक्षसांचे हल्ले परतवताना साधूंना आलेले वीरमरण.
१०. सूर वीरगळ-
या शिलेवर अनेक वाद्य असतात. /एखाद्या कलाकारांचे वीरमरण
११. ताबूत वीरगळ-
विशेष स्मृती असलेल्या शिळा
[३]
अंकन
संपादनयुद्ध ,दरबार, प्राणी, शिवलिंग, हार घेतलेले लोक, अंत्यसंस्कार , माणसांवर उभे बैल, ढाल तलवारी घेऊन युद्धे, विठ्ठल रखुमाई, कलश , वाघांशी युद्ध, नदी, झोपलेली माणसे, नंदीच्या पाठीवर पिंड अशी विविध चित्रे या शिळांवर कोरलेली दिसून येतात.
कोंढावळे येथे आयताकृती व स्तंभ वीरगळ आढळून येतात. गावाबाहेरील महादेवाच्या मंदिरामागे व जवळच असलेल्या स्मशानभूमीत अनेक वीरगळ चांगल्या स्थितीत आढळतात.मुळशी तालुक्यातील चिंचवड, वळणे, नाणेवली, नांदेवली या गावात देखील वेगवेगळ्या ठिकाणी वीरगळ आढळतात.
महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ
संपादन- अहमदनगर जिल्ह्यातील कामरगाव तालुका या ठिकाणी देवनागरी शिलालेख असलेली दुर्मिळ वीरगळ इतिहास अभ्यासक डॉ.संजय बोरुडे आणि श्री. सतीश सोनवणे यांनी शोधून काढली. महाराष्ट्रात शिलालेख असलेल्या मोजक्याच वीरगळी आहेत. शिला-लेखाचे वाचन अद्याप कोणी केलेले नाही.
- जिल्हा रायगड, तालुका माणगाव येथील उंबरडी गावात शिवमंदिरात ४५ वेगवेगळे वीरगळ आहेत.
- दिवेआगर जवळील देगाव शिव मंदिरातील वीरगळ - यातील एकावर दहा डोकी असलेल्या आणि वीस हात असलेल्या व्यक्तीचे अंकन केलेले आहे.
- आंबेश्वर मंदिर, आंबा गाव
- सातारा जिल्हा-किकली
महाराष्ट्रातील पहिले वीरगळांचे गाव.
- नगर जिल्हा-श्रीगोंदा
- रत्नागिरी जिल्हा राजापूर येथे धूतपापेश्वर मंदिर परिसर
- सिंधुदुर्ग जिल्हा- वाडा येथे विमलश्वर मंदिर परिसर
- मु . पो . कोंढावळे ,तालुका मुळशी ,जिल्हा पुणे.[१]
- कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा
- महाराष्ट्राच्या सीमेवरील तेलंगणातील मदनूर या गावी ३.५ फिट उंचीचे दोन सतीशिळा आढळतात. याची माहिती लेखक श्रीपाद राऊतवाड यांनी दिली.
- मु.पो.मोरगिरी ता.पाटण,जिल्हा:सातारा येथील सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात १७-१८ वीरगळ चांगल्या स्थितीत आहेत. विशेष म्हणजे त्याच्यावरील कोरीव काम आताही सुस्पष्ट दिसते. साधारण सर्व वीरगळींची उंची ३-४ फूट व रुंदी १.५-२ फूट अशी आहे. एक चतुर्भुज वीरगळ सुद्धा इथे बघायला मिळते.
अन्य माहिती
संपादनगुजरात आणि सौराष्ट्रात खेडेगावातील वेशीजवळ किंवा आसपास काहे दगड पुरलेले असतात. त्यांना शेंदूर फासलेला असतो. त्यांना “पाळीया” असे म्हणतात. ही आत्मबलिदान केलेल्या लोकांची स्मारके होत. यावर त्या व्यक्तीचे नाव आणि मृत्यूदिन कोरलेला असतो. आदिवासी लोकही वीरगळ उभे करतात. ते मृताच्या स्मरणार्थ “शिणोली” उभी करतात. हा एक कोरीव काम केलेला लाकडी खांब असतो. या खांबाचा आकार, उंची, नक्षीकाम हे मृताच्या सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे असते. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी हे ५ ते ६ फूट उंचीचे वीरगळ तयार करतात. याचा वरचा भाग गोलाकार घोटलेला असतो. हे सूर्यदेवाचे प्रतीक आहे असे ते मानतात. नंतर मानवी चेहरा कोरतात. याच्या दोन बाजूला कमळ, घोडा, चंद्र, तलवार कोरलेली असते. या प्रत्येक चित्राला एक प्रतीकात्मक अर्थ असतो. एटापल्ली तालुक्यात तोडसा गावात तळ्याकाठी नक्षीकाम केलेले चार खांब रोवलेले आहेत. त्यावर आडवे लाकूड बसविलेले असून त्यात सुसर, साप, कासव,अशी चित्रे कोरली आहेत. [४]
संदर्भ
संपादन१. दि. २३ जून २०१३ च्या लोकमत, नागपूर मधील पान क्र. १२ वरील लेख. Archived 2016-03-14 at the Wayback Machine. २. https://sahyadrigeographic072017.blogspot.in/
- ^ a b c बापट आशुतोष. "इतिहासाचे मूक साक्षीदार - वीरगळ (२२. ६. २०१६)".[permanent dead link]
- ^ भारतीय संस्कृती कोश
- ^ डेंगवेकर वृषाली, 'प्र-शिक्षक', ऑक्टोबर २०१७, (ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन)
- ^ भोसले द.ता. संंस्कृृतीच्या पाऊलखुणा,पद्मगंंधा प्रकाशन,2013